सोमवार, १५ नोव्हेंबर, २०१०

एक पावसाळी संध्याकाळ


एक पावसाळी संध्याकाळ


...आठवणींच्या गावातली


- नवज्योत वेल्हाळ


जुलै महिन्यातली 'ती' संध्याकाळ माझ्या आयुष्यातली एक अविस्मरणीय संध्याकाळ म्हणून माझ्या आठवणींच्या गाठोड्यात कयमची बांधली गेलीय...


आज रविवार होता...कॉलेजच्या कॉम्प्युटर सायन्सच्या Assignments कालच लिहून ठेवल्या होत्या...त्यामुळे आज तसा मोकळाच होतो... गेले दोन-तीन दिवस पावसाने नुसता धुमाकुळ घातला होता... नद्यांना पूर आला होता...चिपळुणात शिवनदीला आलेल्या पुरामुळे हाहाकार माजला होता...बरंच नुकसान झालं होतं...त्यामुळे उद्या आणि परवा कॉलेज होईल कि नाही याबद्द्ल जरा शंकाच होती...त्यामुळे मी जरा खुशीतच होतो...


गुहागर तालुक्यातल्या माझ्या वेळंब गावापासून ४०, म्हणजे जाऊन येऊन ८० किमीचा प्रवास उद्या करावा लागणार नाही याचं खूप बरं वाटत होतं...


गेले दोन तीन दिवस वेड्यासारखा कोसळणारा पाऊस आज मात्र जरा थकल्यासारखा वाटत होता... सकाळपासून आकाशात ढगांनी नुसतीच दाटी केली होती...पण त्यातला एकही ढग बरसायला तयार नव्हता...


दुपारपर्यंत कसातरी वेळ काढला...जेवल्यानंतर अर्धा पाऊण तास वामकुक्षी घेऊन उठलो...खूप कंटाळा आला होता...तशातच पाऊसपण पडत नव्हता...त्यामुळे गुहागरला समुद्रावर फेरफटका मारायला जावं असा विचार मनात आला...गुहागर तसं आमच्या गावापासून १५ किमी लांब होतं... ताबडतोब मित्राला फोन केला...


"हॅलो..."


"हॅलो, पंकज, अरे नवज्योत बोलतोय..."


"हां, बोल मित्रा..."


"मोकळा आहेस का...?"


"का रे...?"


"अरे यार...खूप कंटाळा आलाय...गुहागरला जाऊया?...समुद्रावर?..."


"अरे...आलो असतो रे...पण..."


"पण काय...?"


"मला जरा बाहेर जायचंय...सॉरी..."


"ठीक आहे..."


"बाय..."


"बाय..."


याचं बाहेर जाणं म्हणजे शेतात शिरलेल्या नदीच्या पाण्यात मासे पकडायला जाणं हे मी ताबडतोब ओळखलं...


मग काय...एकटाच जायचं ठरवलं...आईने नुकताच चहा केला होता...चहा घेत घेतच आईला म्हणालो...


"आई, मी जरा गुहागरला जाऊन येतो हं..."


"आत्ता? ह्या वेळेला? कशाला?.."


आईच्या प्रश्नांना उत्तरं द्यायची म्हणजे मला टेन्शन येतं...उगाच प्रश्नं वाढवत असते...


"अगं, कंटाळा आलाय, जरा बाहेर फिरून येतो..."


"एकटाच...?"


"हो..."


"सांभाळून जा आणि लवकर ये..."


"हो..."


मी गुहागरला समुद्रावर जातोय हे जर मी आईला सांगितलं असतं, तर तिने मला नक्कीच पाठवलं


नसतं...कारण पावसाचे दिवस होते... समुद्राला उधाणवगैरे आलं तर...


असो...


पटापट कपडे चढवले, चपला घातल्या, रेनकोट सोबत घेतला आणि गाडी काढून निघालो...


पाऊस पडत नव्हता तरी हवेत चांगलाच गारवा होता...आज खूप दिवसांनी गुहागरला जात होतो... मुळातच सुंदर असलेल्या गुहागर परिसराने आज ओली हिरवळ एखाद्या शालूसारखी पांघरली होती...दूर डोंगरावर दाटलेल्या धुक्यामुळे जणू काही ढगच जमिनीवर उतरल्याचा भास होत होता... डोंगरावरून छोट्या-मोठ्या जलप्रपातांची खाली उतरण्याची जणू शर्यतच लागली होती...खाली येईपर्यंत उसळणारे हे छोटे जलप्रपात खाली आल्यावर मात्र एखाद्या शहाण्या मुलासारखे शांतपणे झरा होऊन वाहत होते...मध्येच एखाद्या झ-यात पाणसाप दिसायचा... एका निर्जन ठिकाणी थांबून निसर्गाचं हे सुंदर मोहक रूप थोडा वेळ मुग्ध होऊन पाहत बसलो...पक्षांची किलबिल, वा-याचा आवाज, -यांचा अवखळ नाद, झाडांच्या ओल्या पनांवरून ओघळणा-या थेंबांची टपटप...यांमुळे वातावरण एका नैसर्गिक मधुर संगिताने भारलं होतं...हे सगळं पाहून, ह्या सुंदर सृष्टीत जन्माला घातल्याबद्द्ल त्या


सृष्टीनिर्मात्याचे मनोमन आभार मानून मी निघालो...


निसर्गाच्या ह्या मुक्त सौंदर्यप्रदर्शनाने दृष्टी तृप्त होत असतानाच हवेतल्या गारव्यामुळे एखादी गार शिरशिरी अचानक अंगभर सरसरून जायची...


शेवटी एकदाचा गुहागरला पोचलो...एके ठिकाणी टपरीवर मस्तपैकी गरमारगरम कटींग मारली...पाऊस पडत असताना एखाद्या हॉटेलच्या चार भिंतीत बसून चहा पिण्यापेक्षा रस्त्याच्याकडेला एखाद्या टपरीवर भिजतभिजत चहा पिणं जास्तं छान वाटतं...कारण तिथे चहाची उष्णता आणि पावसाचा गारवा एकाच वेळी अनुभवता येतो...


अगदी Claasic अनुभव असतो तो...


चहा संपवून समुद्राकडे निघालो...समुद्राकडे जाणा-या त्या गल्लीवजा अरूंद रस्त्यात गाडी घुसवली... हळुहळु समुद्र नजरेसमोर येत होता... खा-या वा-याच वेग आणि आवाजही हळुहळु वाढत होता...अखेर एके ठिकाणी गाडी पार्क केली... घड्याळात पाहिलं...चार वाजले होते... आणि... कसलीतरी अनामिक ओढ लागावी तसा पटापट पावलं टाकत समुद्राकडे निघालो... चालताना ओल्या वाळूत पाय अक्षरशः भरून गेले होते...पण तिकडे लक्षच नव्हतं... समोर दिसत होता तो फक्त विशाल समुद्र...


त्याच्यापासून थोडा लांब उभा राहून त्याच्याकडे नुसता पाहत राहिलो...काही जुने संदर्भ गवसतात का ते पाहत... घोंघावणारा खारा वारा कानांशी नको तितकी सलगी करत होता...लाटांना तर काय झालं होतं देव जाणे... एखाद्या स्वच्छंदी तरूण मुलीप्रमाणे बागडत उंच उसळत होत्या... नेहमीचा धीरगंभीर समुद्र आज जरा वेगळ्याच मुडमध्ये वाटत होता...खरं तर तो वेगळ्या मुडमध्ये होता कि मी...असा क्षणभर प्रश्न पडला...त्याच्या त्या उंच उसळणा-या लाटांकडे पाहून माझ्या मनातही आठवणींच्या असंख्य लाटा उसळु लागल्या होत्या...


समुद्राच्या दुरवर दिसणा-या धुसर क्षितिजाकडे एकटक पाहत होतो...हळुहळु आठवणींच्या गावात कधी गेलो कळलंच नाही...याच समुद्रापाशी माझ्या अनेक आठवणी जोडल्या गेल्या होत्या...माझं ११वी-१२वीचं शिक्षण इथेच-गुहागरला झालं होतं... कॉलेज लाईफचं ते पहिलं पर्व अनेक कारणांसाठी अविस्मरणीय ठरलं होतं...एखादा ऑफ पिरीयड मिळाला कि आम्ही आमच्या सॅक घेऊन समुद्राकडे पळायचो... सुरूच्या झाडाला सॅक अडकवून किना-यावर कॅच-कॅच खेळत राहायचो...कधी-कधी लाटांबरोबर किना-यावर वाहत येणारे स्टारफिश पकडून वर्गात घेऊन जायचो आणि मुलींवर फेकायचो...हे सगळं आठवत असतानाच मध्येच हसूही येत होतं...


माझ्याबरोबरची काही 'अँगेज्ड' मुलं त्यांचं आणि त्यांच्या 'तिचं' नाव वाळूत कोरायची...मग एखादी खट्याळ लाट यायची आणि त्यांचं ते कोरीव प्रेम विस्कटून क्षणार्धात नाहीसं व्हायचं...मग पुन्हा नावं कोरली जायची...लाटा मात्र राजा विक्रमाप्रमाणे आपलं कर्तव्य पुन्हा पुन्हा बजावायच्या...


इथेच...याच समुद्रकिना-यावर बसून मी माझी पहिली प्रेमकविता लिहीली होती...त्याची आठवण झाली आणि मन अलवारपणे मोहरून आलं...हळुवार आणि विलक्षण भावनांचा उत्स्फुर्त आविष्कार म्हणजे प्रेम...प्रेमाची पहिली ओळख इथेच झाली(पण मी कोणाच्या प्रेमात पडल नव्हतो हं..फक्त प्रेमभावनेची जाणीव झाली...)तिथुनच माझ्या प्रेमकवितांच्या प्रवासाला सुरूवात झाली होती...प्रेमावरच्या माझ्या छोट्या छोट्या चारोळ्या वर्गातल्या मुलांनाही आवडत होत्या...त्यामुळे अधिकच बरं वाटायचं...हळुहळु मी कवितांच्या राज्यातही ब-यापैकी रमू लागलो होतो...त्यातल्या ब-याचशा कविता ह्या मावळतीचा सुर्य आणि घनगंभीर समुद्राला साक्षी ठेवूनच लिहिल्या गेल्या होत्या...११वी-१२वी च्या त्या दोन वर्षात समुद्र माझा खूप जवळचा मित्र झाला होता...


.......


१२वी चा शेवटचा पेपर झाला...आणि आम्ही सर्व मित्र कट्ट्यावर एकत्र जमलो...कदाचित शेवटचंच...आज घरी लवकर जायचं नाही असं सगळ्यांनी एकमुखाने ठरवलं...मग जायचं क़ुठे...


"समुद्रावर...!!!"


सगळे एकमुखाने ओरडले...खरंच...त्या दोन वर्षात या समुद्राशी आम्हां सर्वांचं एक वेगळंच नातं जुळलं होतं...त्यामुळे सगळ्यांनाच त्याच्याबद्द्ल ओढ होती...


शेवटी समुद्रावर जायचं पक्कं झालं आणि आम्ही निघालो...मध्येच रस्त्यात आमचे Physics चे श्री. मेटकरी सर भेटले...आमच्यासोबत समुद्रावर येण्याबद्द्ल आम्ही त्यांना विनंती केली...पण त्यांनी नकार दिला...शेवटी आम्ही हट्ट केला...


"सर, चला ना..."


"परत तुम्हांला त्रास द्यायला आम्ही ह्या कॉलेजात असणार नाही..."


"फक्त आजच, पुन्हा नाही..."


सरांना आम्ही अक्षरशः इमोशनली ब्लॅकमेल करत होतो...ते तयार झाले...शेवटी आम्ही समुद्रावर निघालो...गप्पा मारत मारतच समुद्रावर पोचलो...


मी कॅमेरा आणला होता...सगळ्यात आधी सरांनी आम्हां सर्व मित्रांचा फोटो काढला...मग तिथेच उभ्या असलेल्या एका माणसाला सरांसोबत आमचा फोटो काढायला सांगितला...फोटोसेशन झाल्यावर सरांनी सगळ्यांना आईस्क्रीम दिलं...मग मनसोक्त गप्पा झाल्या...सर तर अगदी आमच्यातीलच एक बनून गप्पांत रंग भरत होते...पुढे काय करायचं...ग्रॅज्युएशन कुठल्या कॉलेजला करायचं...कि इंजिनिअरींग-मेडीकलला जायचं...रीझल्ट लागेपर्यंत काय...या आणि अशा अनेक विषयांवर गप्पा झाल्या... मध्येच कॉलेजमधले काही गंमतीशीर किस्से आठवून खळखळून हसत होतो...खरंच...ते दोन तास वेगळेच होते...त्या दोन तासांनी परिक्षेचा सगळा क्षीण नाहीसा केला होता...हळुहळु सुर्य मावळतीकडे सरकत होता...तसे आम्ही निघालो...निघता निघता सरांनी सर्वांना पुढच्या आयुष्यात उपयोगी पडतील असे मार्गदर्शनपर चार शब्द सांगितले...त्यांचं एक वाक्य मी अजूनही विसरलेलो नाही--


..."Never change your Originality for the sake of others, because in this world, no one can play your role better than you...So be yourself and win others..."


आणि मग...अचानक...काय झालं कुणासठाऊक...मार्च महिन्यातल्या त्या भर उन्हात आमच्या डोळ्यांत मात्र ढग दाटून आले होते... पापण्यांच्या कडा ओलावल्या होत्या...आम्ही सर्व एकमेकांना मिठी मारून डोळ्यांतलं पाणी लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होतो...काही जण तर अक्षरशः रडले...आता पुन्हा कधी भेट...माहित नाही...दोन वर्षांतल्या आठवणींनी डोळ्यां गर्दी केली होती... ओठ स्तब्ध होते...प्रत्येकाच्या ओठांवर फक्त अस्फुटसं हास्य तेवढं होतं...ज्या समुद्राच्या अंगाखांद्यावर आम्ही दोन वर्ष खेळलो-बागडलो... आज त्याच समुद्राच्या अंगणात त्याला साक्ष ठेवून आम्ही एकमेकांपासून दूर जात होतो...अखेर कसेबसे स्वतःला सावरून आम्ही एकमेकांचा निरोप घेतला आणि परतीच्या वाटेला लागलो...डोळ्यांतल्या पाण्यामुळे ती वाट मला जरा अंधुक दिसत होती...आणि अचानक...इतकावेळ पापण्यांना घातलेला बांध फुटला...आणि दोन थेंब गालांवर सांडले...पण...पण...अश्रु तर उष्ण असतात ना...


मग हे थेंब गार कसे...??...


...डोळे उघडले आणि पाहिलं तर समोर विशाल समुद्र आणि त्याच्या छातीवर झालेली ढगांची दाटी...पावसाला सुरूवात झाली होती... त्याचेच ते थेंब होते...त्यांनीच माझी तंद्री भंग केली होती...घड्याळात पाहिलं....३० वाजले होते...म्हणजे गेले दिड तास मी इथेच उभा होतो...जुन्या आठवाणींत हरवून...


शेवटी समुद्राकडे पाहून हलकेच हसलो...आणि त्याचा निरोप घेऊन निघालो...पण...जाता जाता पुन्हा मागे वळून पाहण्याचा मोह मात्र मला आवरला नाही...वळून पाहिलं...डोळ्यांतल्या आसवांना हळूच वाट मोकळी करून दिली...आणि..ओठांवर चार ओळी सहजच तरळल्या...


मागे वळून पाहताना


ढग आठवणींचे दाटतात,


बरसताना दोन थेंब


गालांवर सांडतात....



~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


navjyotvelhal2009@gmail.com


९४२१४३८००७, ८०९७१६८३२०